
इचलकरंजी –
इचलकरंजी शहराच्या सर्वागीण विकासात बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाई इचलकरंजी यांचा मोलाचा वाटा आहे. शहराचे वेगळेपण आणि सुंदरता जोपासण्यासह हरित इचलकरंजी व रेनवॉटर हार्वेस्टींगच्या कामात महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली.
जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय व निमशासकीय गुणवंत अभियंता (इंजिनीअर) यांच्या गौरव सोहळ्यात आयुक्त पाटील बोलत होत्या. यावेळी अभियंता संदेश कुळवमोडे, रामप्रसाद पाटील, डॉ. बाजीराव कांबळे, प्रशांत भोसले आणि अभियंता शाहीन बिजाली या अभियंत्यांचा शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना क्रेडाई, बिल्डर्स असोसिएशन व अल्ट्राटेक सिमेंट यांच्या वतीने इचलकरंजी शहर ग्रीन सिटी करण्यासाठी शहरवासियांना घरफाळा व पाणीपट्टीत काही सवलत देता येईल का या मागणीचा महापालिका प्रशासन सकारात्मक विचार करेल. क्रेडाई व बिल्डर्स असोशिएशन यांचे शहराच्या विकासात योगदान असून त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात महापालिका सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
प्रारंभी भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेशरैय्या यांच्या प्रतिमेचे पुजन इंजिनिअर रमेश मर्दा आणि राजेंद्र खंडेराजुरी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत बिल्डर्स असोशिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष फैयाज गैबान यांनी केले. प्रास्ताविकात अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर नितीन धुत यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय देताना बिल्डर्स असोशिएशन आणि क्रेडाई इचलकरंजीच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड शितलराज सिंदखेडे यांनी, घर बांधणीसाठी उपयुक्त अल्ट्राटेक सिमेंटच्या विविध उत्पादनांची विस्तृत माहिती देत अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने १५०० फुटापासून पुढे सर्वच घरांसाठी आयजीबीएस प्रमाणपत्र दिले जाईल. इचलकरंजी शहर हरित आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगने परिपूर्ण होण्याची संकल्पना पूर्णत्वास नेण्यास अल्ट्राटेक सिमेंट संपूर्ण सहकार्य करेल, असे सांगितले.
क्रेडाई इचलकरंजीचे अध्यक्ष रणजित लायकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर शहा यांनी केले. याप्रसंगी अल्ट्राटेक सिमेंटचे टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर, विभागीय तांत्रिक प्रबंधक सागर छागाणी कोल्हापूर राजृ पाटील, राजेंद्र शिंत्रे, शितल काजवे, पुंडलिक जाधव, प्रितेश शहा तसेच क्रेडाई आणि बिल्डर्स असोशिएशनच्या मेंबर्स १५० पेक्षा अधिक उपस्थित होते.
