
इचलकरंजी –
जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय व निमशासकीय गुणवंत अभियंता (इंजिनीअर) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये इंजिनीयर संदेश बाळासाहेब कुळवमोडे, आर्किटेक्ट शाहीन मन्सूर बिजाली, इंजिनीयर रामप्रसाद धोंडीराम पाटील, इंजिनीयर डॉ. बाजीराव अण्णाप्पा कांबळे व इंजिनीयर प्रशांत संभाजी भोसले यांचा समावेश आहे, अशी माहिती क्रेडाई इचलकरंजी अध्यक्ष रणजीत लायकर, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी चे अध्यक्ष फैयाज गैबान व व अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धूत यांनी दिली.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय व निमशासकीय सेवेतील अभियंत्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. उल्लेखनीय काम केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार सोहळा मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सौ सरस्वती रामकिशोर धूत ऑडिटोरियम क्रेडाई ऑफिस सांगली रोड इचलकरंजी येथे संपन्न होत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त सौ पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड शितलराज सिंदखेडे आणि टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर हे अल्ट्राटेक बिल्डिंग उत्पादन व आयजीबीएस प्रमाणपत्र या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
पुरस्कारप्राप्त संदेश कुळवमोडे हे सध्या कोल्हापूर येथे सहाय्यक नगर रचना संचालक म्हणून सेवेत आहेत. शाहीन बिजली या आर्किटेक्ट असून त्यांनी डेव्हलपमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अनेक प्रकल्प हाताळले आहेत. रामप्रसाद पाटील हे इंजिनीयर सोबतच प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहेत. इचलकरंजी शहर व परिसरातील अनेक मोठे प्रकल्प त्यांनी साकारले आहेत. डॉ. बाजीराव कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत बांधकाम व पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत असून शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत धडपडत असतात. तर मूळचे इस्लामपूरचे असलेले इंजिनीयर प्रशांत भोसले हे सध्या इचलकरंजी महानगरपालिकेत नगर रचनाकार म्हणून कार्यरत आहेत. या पाच अभियंत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी रमेश मर्दा, मयूर शहा, शितल काजवे, राजू पाटील, सय्यद गफारी, राजेंद्र शिंत्रे , राजेंद्र खंडेराजुरी, जहीर सौदागर, तानाजी हराळे, पुंडलिक जाधव, दिलीप पटेल, दादासो भाटले आदी उपस्थित होते.
