इचलकरंजी महापालिकेच्या मक्तेदारांची टक्केवारीवर भिस्त..


इचलकरंजी (ता. ३ सप्टेंबर) – इचलकरंजी महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पर्यावरणपूरक जलकुंडांची व्यवस्था करून गणेश विसर्जन सुरळीत पार पडले. या कामात महापालिकेचे अनेक कर्मचारी सकाळपासून उशिरापर्यंत तळमळीने कार्यरत होते. परंतु, या कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आलेल्या जेवणाबाबत गंभीर तक्रारी पुढे आल्या असून जेवण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नगरसेवक व पदाधिकारी यांच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र, जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता. अन्नही अपुरे होते. कामाच्या प्रचंड ताणात दिवसभर जबाबदारी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे निकृष्ट जेवण मिळणे हा मोठा अन्याय असल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी भाजपचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त तसेच प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह खच्चीकरण होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्यांच्याकडून बिल न घेणे आणि त्यांचे नाव ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या घडामोडीमुळे पालिकेच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील चौकशीनंतर जबाबदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
