
कोल्हापूर :
रोहा, रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलचे कला विभागप्रमुख प्रा. अनिल जयवंत शिंदेपाटील व त्यांच्या टीमने साकारलेल्या भव्य रांगोळीची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व युनायटेड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
सव्वा लाख चौ.फुट एवढ्या प्रचंड क्षेत्रफळावर अवघ्या 70 तासांत 70 कलाकारांनी ही रांगोळी साकारून इतिहास घडवला. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य दर्शन या रांगोळीतून घडवून छत्रपतींच्या वैभवशाली परंपरेला उजाळा देण्यात आला.
या विक्रमी रांगोळीची दखल घेऊन दोन्ही आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमी संस्थांनी प्रा. अनिल शिंदेपाटील यांना मानाचा बहुमान दिला आहे. रोहा, रायगड येथे घडविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे शिवप्रेमींचा अभिमान उंचावला असून, जागतिक स्तरावर शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली स्मृतीला उजाळा मिळाला आहे. संजय घोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले स्कुलच्या संचलिका-प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी अनिल शिंदे यांचे अभिनंदन केले. अनिल शिंदे यांचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
